मराठी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत.मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्यासोबत झाले. या दाम्पत्याला एक मुलगा असून अनिकेत हे त्याचे नाव आहे. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांच्या खासगी आयुष्याविषयी...
पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत अशोक सराफ
अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र अशोक सराफ त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल 18 वर्षांनी मोठे असल्याचे फार जणांना ठाऊक नसावे. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म 6 जून 1965 चा आहे. या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे.
पुढे वाचा,
- अशोक सराफ यांचा'दोन्ही घरचा पाहुणा' हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा सहा वर्षांच्या होत्या निवेदिता...
- गोव्यात लग्न करण्यामागे होते खास कारण... यासह बरंच काही...
...तेव्हा सहा वर्षांच्या होत्या निवेदिता
विशेष म्हणजे 1971 साली अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे होते. तर निवेदिता सराफ 1971 साली केवळ सहा वर्षांच्या होत्या. पुढे सिनेसृष्टीत एकत्र काम करत असताना निवेदिता आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.
गोव्यात लग्न करण्यामागे होते खास कारण...
निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध मंगेश मंदिरात झाले होते. गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. येथेच हे मंदिर आहे. यामागचे कारणही तसेच आहे. अशोक सराफ यांची गणपती आणि शंकरावर मोठी आस्था आहे. तर मंगेशी हे त्यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे याच ठिकाणी लग्न करण्याचा अशोक सराफ यांनी निर्णय घेतला होता.
लग्नानंतर निवेदिता यांनी घेतला 13 वर्षांचा ब्रेक...
अशोक सराफ यांच्यासोबत लग्न झाले तेव्हा निवेदिता यांचे मराठी सिनेसृष्टीतील करिअर यशोशिखरावर होते. पण मुलाच्या जन्मानंतर त्यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचे ठरवले. मुलाचे संगोपन करताना पालक म्हणून आपण कुठेही मागे पडू नये, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. तब्बल 13 वर्षे त्या अभिनयापासून दूर राहिल्या होत्या.
अशोक सराफ सांगतात, निवेदितामुळे मी पुढे जाऊ शकलो...
निवेदिताने घरातील जबाबदारी समर्थपणे पेलल्याने करिअरमध्ये मी पुढे जाऊ शकलो, असे अशोक सराफ अभिमानाने सांगतात. करिअर यशोशिखरावर असताना त्यापासून ब्रेक घेणे ही एक प्रकारची तडजोड आहे आणि ती निवेदिताने केली, असेही अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
मामला पोरीचा, धुम धडाका, नवरी मिळे नव-याला, बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, अशी ही बनवाबनवी, फेका फेकी, माझा छकुलासह अनेक चित्रपटांमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता यांनी एकत्र काम केले.
पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत मिळून अशोक सराफ यांनी एक निर्मिती संस्था स्थापन केली. त्यातून त्यांनी 'टन टना टन' (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एक मुलगा असून त्याचे नाव अनिकेत आहे. निवेदिता आणि अशोक सराफ हे आजही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत
No comments:
Post a Comment